मा.ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते कृषी विद्यापीठाच्या भित्तीपत्रकाचे विमोचन
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाने केंद्र शासनाच्या धोरणाला अनुरूप “संतुलित खत वापर” या विषयावरील भित्तीपत्रक शेतकरी बांधवांसाठी तयार केले आहे. या भितीपत्रकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व, माती परीक्षण, शाश्वत मृद आरोग्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, जैविक खतांचा वापर, हिरवळीच्या खतांचे फायदे, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना, विद्राव्य खतांचा वापर, रासायनिक खत वापरायची पंचसूत्री, सेंद्रिय खतांचा एकात्मिक वापर, आंतरपीक, पीक फेरपालट या महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत.अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम नियोजन व आढावा बैठकीत या महत्त्वपूर्ण भित्तिपत्रकाचे विमोचन राज्याचे जलसंधारण मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आ. श्री. अमोल खताळ, आ.श्री. विठ्ठल लंघे, आ. श्री. विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सुधाकर बोराळे तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. रवी आंधळे, डॉ. पंडित खर्डे, डॉ. संजय तोडमल आणि प्रा. अन्सार आत्तार यांची उपस्थिती होती. सद्यस्थितीत शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामात पिकांना संतुलित खत व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्याचे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केले आहे.जिल्ह्याच्या खरीप हंगाम नियोजन व आढावा बैठकीत विद्यापीठाच्या संचालकांनी ही बाब माननीय मंत्री महोदय आणि उपस्थित यांच्या निदर्शनास आणून याविषयी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संतुलित खत वापरासाठी भित्तीपत्रकाचे महत्व विशद केले. माननीय मंत्री महोदयांनी या उपक्रमाचे कौतुक करून कृषी विभागाला ही भित्तिपत्रके गावोगावी प्रदर्शित करण्याच्या सूचना दिल्या. सदर बैठकीत संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी खरीप हंगामासाठी विद्यापीठात उपलब्ध असलेल्या बियाणे, जैविक खते याविषयीची माहिती दिली. विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी माननीय मंत्री महोदय आणि उपस्थितांना विद्यापीठाची प्रकाशने दिली.
दिपक साळवे सह योगेश पवार NEWS 14

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




