महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न कुलगुरू डॉ. विलास खर्चे
राहुरी विद्यापीठ, दि. 15 ऑगस्ट, 2026 कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण व नवोपक्रमात उल्लेखनीय कार्य केले आहे. यामध्ये शिक्षणात विद्यापीठाने आत्तापर्यंत 1,66,170 पदव्या दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध फोरम स्थापन केले आहेत. यावर्षी विद्यापीठ 11 वाण, 5 यंत्रे व 80 तंत्रज्ञान शिफारशी प्रसारीत करत आहे. विद्यापीठ कृषि विस्ताराच्या नवनविन संकल्पना राबवत आहे. यामध्ये फुले समृध्द गाव, फुले पोकरा संजिवनी गाव, शास्त्रज्ञ थेट शेतकर्यांच्या बांधावर, फुले कृषि महोत्सव याद्वारे कृषि तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकर्यांपर्यंत पोहचत आहे. कृषि विद्यापीठ हे शेतकरी विकासाचे केंद्र बनवून ज्ञान, संशोधन व तंत्रज्ञानाद्वारे शेतकर्यांचे जीवन समृध्द करुया असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण केल्यानंतर मार्गदर्शन करताना डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कुलसचिव श्री. राजेंद्रकुमार पाटील,विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, कृषि तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र हिले, प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नरेंद्र काशीद, सर्व विभाग प्रमुख, एनसीसी अधिकारी लेफ्ट. डॉ. सुनील फुलसावंगे व सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे उपस्थित होते.
डॉ. विलास खर्चे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आज आपण 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. विद्यापीठात खेत बचाओ अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या संकल्पनेनुसार बायोहॅप्पीनेस सेंटरची स्थापना विद्यापीठात करण्यात आली असून याद्वारे मॉडेल व्हिलेजच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले आहे. हवामान बदलाला तोंड देणार्या सक्षम वाणांची निर्मिती, डिजिटल तंत्रज्ञान विकसीत करत आहोत. तसेच स्पीड ब्रिंडिंग यंत्रणा आपण विकसीत करणार आहोत. शेतीसमोर असलेल्या समस्यांना लक्षात घेऊन हे विद्यापीठ संशोधनामध्ये यशस्वी वाटचाल करत असल्याचे यावेळी ते म्हणाले. यावेळी पदव्युत्तर महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. विलास आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी वसतीगृहाचे भुमीपुजन तसेच फुले स्पर्धा परीक्षा मंच कार्यालय, काढणी पश्चात तंत्रज्ञान ड्राइंग शेड, कीटकशास्त्र विभागाच्या जैविक नियंत्रण प्रयोगशाळेसाठी साठवण गोदाम, उद्यानविद्या टेकडी विभागाच्या शेततळ्याजवळ पंप हाऊस व स्टोअर रूम, डेअरी विभागाचे प्रशिक्षण केंद्र, ज्वारी सुधार प्रकल्प येथील राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत गोडाऊन आणि थ्रेशिंग यार्ड, उद्यानविद्या विभागातील भाजीपाला पैदासकार ग्लास हाऊस नूतनीकरण, थ्रेशिंग यार्ड, कांदा जनुकिय साठवण चाळ तसेच नैसर्गिक शेती प्रकल्प येथे शेडनेट, पॉलिहाऊस, इ-कार, सेंद्रिय निविष्ठा व उत्पादन, इ. बांधकामांचे उद्घाटन व शेतकरी-शास्त्रज्ञ उद्योजक मंचाचा शुभारंभ यावेळी कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते करण्यात आले. सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे यांनी सूत्रसंचालन केले. स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यापीठ प्रतिनिधी.आर.आर.जाधव

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




