पढेगाव ता. श्रीरामपूर येथे खेत बचाओ अभियानांतर्गत कार्यक्रम संपन्न
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली पढेगाव (ता. श्रीरामपूर) येथे खेत बचाओ अभियानांतर्गत रासायनिक खतांचा संतुलित वापर व मृदा आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान विभागांतर्गत माती परीक्षण व पीक प्रतिसाद प्रकल्प व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. याप्रसंगी मृद रसायनशास्त्रज्ञ डॉ. आनंद जाधव, मृद विज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. क्रांती पाटील, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. शुभांगी कदम, मंडल कृषि अधिकारी श्रीमती पौर्णिमा गाढे, प्रगतशील शेतकरी शंकरराव चौधरी, सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती तृप्ती तनपुरे व कृषि सहाय्यक आर. बी. शिंदे उपस्थित होते.
यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनामध्ये डॉ. आनंद जाधव यांनी प्रातिनिधिक मृदा नमुना गोळा करण्याचे प्रात्यक्षिक घेऊन जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन व पीक नियोजनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी एल निनो प्रभावाखाली पाऊसमान परिस्थितीत व अवर्षण प्रवण काळामध्ये सोयाबीन व ऊस पिकावर विद्राव्य खतांच्या फवारणीद्वारे पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये वापर करण्याचा सल्ला दिला. याबरोबरच उसामध्ये लागवडीपूर्वी देण्यात येणार्या खतमात्रेसोबत शेणखत, प्रेसमड, कंपोस्ट किंवा गांडूळ खत अथवा कोंबडी खत देण्याचे महत्त्व विशद केले. डॉ. क्रांती पाटील यांनी माती, पाणी नमुना घेण्याचे तंत्र, महत्व व माती परीक्षण पीक प्रतिसाद उत्पन्न उद्दिष्टे समीकरणाद्वारे संतुलित खतमात्रा देऊन पीक उत्पादन साधण्याचे तंत्र या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. शुभांगी कदम यांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांची पिकांसाठी आवश्यकता महत्त्व व फुले मायक्रोग्रेड II फवारण्याचे आवाहन केले. पढेगाव येथील प्रगतशील शेतकरी शंकरराव चौधरी यांनी त्यांच्या मनोगतात शेतीतील आर्थिक प्रगतीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती तृप्ती तनपुरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पढेगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष महेश बनकर, शेतकरी गट अध्यक्ष दत्तात्रय लिफ्टे, प्रल्हाद बनकर, मोहन बनकर, दिलीप लिफ्टे, आशुतोष बनकर, ज्ञानेश्वर येसेकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यापीठ प्रतिनिधी…आर.आर जाधव

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार





















