शेतकर्यांनी कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी आवाहन केले
आपल्या राज्यातच नव्हे तर देशात अग्रगण्य असणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कृषी संशोधनात नेत्रदीपक कामगिरी केली असून विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या पौष्टिक तृणधान्य प्रकल्पअंतर्गत आयोजित खेत बचाव अभियान आणि नागली बियाणे वाटप कार्यक्रमप्रसंगी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत बोडके बोलत होते. यावेळी कृषी तंत्र शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता व वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. विजू अमोलिक, राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख अन्वेषक डॉ. पंडित खर्डे, सहसमन्वयक प्रा. अन्सार अत्तार, मोहरी गावचे सरपंच पोपट नरोटे आणि सामाजिक कार्यकर्ते दगडू शेंडगे उपस्थित होते.
डॉ. प्रशांत बोडके पुढे म्हणाले की पौष्टिक तृणधान्यापैकी असलेले नागली हे पीक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून त्याची लागवड शेतकर्यांनी करावी. नागलीपासून अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात आणि यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात निश्चित भर पडेल. याबरोबरच एकात्मिक शेती पद्धतीचे फायदे त्यांनी उपस्थित शेतकर्यांना सांगितले. डॉ. विजू अमोलिक मार्गदर्शन करताना म्हणाले की मोहरी गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी मृदसंधारण कामाला भरपूर वाव आहे. शेतकर्यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन वाणांचा वापर करून आपले पीक उत्पादन वाढवावे. शेतकर्यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास मोहरी हे गाव एक आदर्श गाव ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक आणि कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून या प्रकल्पाविषयी माहिती दिली. कुलगुरू डॉ. विलास खर्चे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांचे मार्गदर्शन प्रकल्पाला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दगडू शेंडगे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की मोहरी गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम ग्रामस्थांच्या मदतीने राबवत आहोत. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे असे ते म्हणाले. यावेळी खेत बचाओ अभियानाच्या माहितीपत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमप्रसंगी शेतकर्यांना नागली पिकाच्या फुले कासारी वाणाच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट नरोटे यांनी केले. या कार्यक्रमाला मोहरी गावातील शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यापीठ प्रतिनिधी. आर.आर.जाधव. NEWS 14

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




