मातापुर येथे ऊस उत्पादन तंत्रज्ञान व खरीप पूर्व नियोजन मार्गदर्शन मेळावा संपन्न
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर तालुक्यातील मातापुर येथे ऊस उत्पादन तंत्रज्ञान आणि खरीप पूर्व नियोजन या विषयांवर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील यांच्या प्रयत्नातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मृदशास्त्रज्ञ डॉ. सुभाष घोडके, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. प्रवीण गोसावी, तालुका कृषि अधिकारी श्री. उल्हास राक्षे, कृषि अधिकारी श्रीमती पौर्णिमा गाढे, उप कृषि अधिकारी श्री. रियाज शेख, कृषि सहाय्यक श्री. शेषराव देशमुख उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुभाष घोडके यांनी ऊस उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना ऊस पिकाचे विविध वाण, त्यांची वैशिष्ट्ये, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या चर्चासत्रादरम्यान शेतकर्यांच्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले. खरीप पूर्व नियोजन या विषयावर बोलताना श्री. प्रवीण गोसावी यांनी भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार एल नीनोच्या प्रभावामुळे आगामी खरीप हंगामात सरासरीचे 88% पाऊस होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. कमी पर्जन्यमानाची शक्यता लक्षात घेऊन शेतकर्यांनी मठ, मूग यासारखी कमी कालावधीची पिके घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. पाण्याचा ताण सहन करणार्या खरीप पिकांच्या वाणांची निवड करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी सहाय्यक कृषि अधिकारी तृप्ती तनपुरे यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याबाबत प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रगतशील शेतकरी श्री. भगिनाथ शिरोळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




