दुर्गम भागातील शेतकर्यांना राहुरी कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजनेचा पौष्टिक तृणधान्य प्रकल्प राबविला जात आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यात राबविला जात आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्त्रज्ञांनी अकोले तालुक्यातील धामणवन या दुर्गम गावात जाऊन शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, उद्यानविद्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. अन्सारखान अत्तार आणि पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील अडांगळे यांचा समावेश होता. यावेळी धामणवन येथील हनुमान शेतकरी गटाचे शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. खर्डे यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या पौष्टिक तृणधान्य प्रकल्पाची माहिती दिली. त्याचे उद्दिष्ट स्पष्ट करताना ते म्हणाले की या भागात पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीने घेणार्या नागली पिकाला आता आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आले आहे. नाचणीमधील पौष्टिक गुणधर्म पाहता महात्मा फुले कृषि विद्यापीठाने फुले कासारी नावाचा वाण विकसित केलेला आहे. शेतकर्यांनी या वाणाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रा. अत्तार यांनी शेतकर्यांना फळपिके आणि भाजीपाला पिकांबद्दल माहिती दिली. डॉ. अडांगळे यांनी दुग्ध उत्पादन वाढण्यासाठी चारा पिकांचे महत्त्व तसेच शेळीपालन आणि कुक्कुटपालन याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी या शेतकरी गटाला फुले कासारी या नागली वाणाच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संतुलित खत वापराविषयी आणि खेत बचाओ अभियान याबद्दल जनजागृती करण्यात आली. शेतकर्यांनी तयार केलेल्या भाताची फुले समृद्धी वाणाच्या रोपवाटिकेला शास्त्रज्ञांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेतकरी गटाचे अध्यक्ष लक्ष्मण धराडे, सचिव नामदेव सुकटे, यशवंत बारामते आणि सदस्य उपस्थित होते.
विद्यापीठ प्रतिनिधी.आर.आर.जाधव

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




